वीरपित्याच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्वावर आठवडाभरात मुलाला मिळाली नोकरी!

नाशिक (प्रतिनिधी): सेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या कर्मचा-याच्या वारसास अवघ्या आठ दिवसांच्या आत एक्साइज विभागाने अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घेतले आहे. शासकीय कार्यालयांमध्ये होणा-या दिरंगाईमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाने याला छेद देत कार्यतत्परता दाखविल्याने विभागाचे कौतुक होत आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी या नियुक्तीबाबत गंभीर दखल घेत आदेश दिल्याने आठवडाभराच्या आत जिल्हा पातळीवरील कागदोपत्री सोपस्कार पार पाडून अनुकंपा तत्त्वावर ही नियुक्ती देण्यात आली आहे. कुटुंब प्रमुख गेल्याच्या दु:खात असलेल्या या कुटुंबीयांना विभागाने दाखविलेल्या तत्परतेने दिलासा दिला आहे. विशेष म्हणजे राज्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्वत: संबंधित कर्मचाºयाच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाला नियुक्तिपत्र प्रदान केले. दि. ८ जुलै रोजी चांदवड तालुक्यातील हरसूल शिवारात मद्यतस्करांचा पाठलाग करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात झाला होता. या अपघातात जवान तथा वाहनचालक कैलास गेणू कसबे यांना वीरमरण आले. या प्रकरणात शासकीय वाहनास धडक देऊन पसार झालेल्या दोन संशयितांसह मुख्य दारू तस्करास गुजरात राज्यात जेरबंद करण्यात आले. पोलीस या घटनेच्या तळाशी जाऊन शोध घेत असताना ना. शंभुराज देसाई यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. दारू तस्करी रोखताना वीरमरण आलेल्या कसबे यांच्या कुटुंबीयाना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश त्यांनी जारी केले. अधीक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावरील प्रक्रिया पार पाडत अवघ्या तीन दिवसांत वीरपित्याचा पुत्र तेजस कसबे यांना अनुकंपा तत्त्वान्वये जवान पदासाठी शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देण्यात आल्याने तेजस कसबे यांना १५ जुलैपासून जवान पदावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात आले आहे. विभागाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!