पंचवटी (प्रतिनिधी) : येथील कैलास मठात सोमवारी (दि. २) श्रावणमास पूर्णाहुती सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सकाळी ९ वाजता फळे व कमळपुष्प अर्पण करण्यात येणार आहेत. त्यासाठी अहमदाबाद येथून कमलपुष्प आणण्यात आली असून, ती ब्रह्मवृंदाच्या मंत्रोच्चारात अर्पण केली जाणार आहे.
कैलास मठात श्रावण महिन्यात ओंकारेश्वर येथील नर्मदा नदीतून आणलेल्या ५ हजार शंभर शिवलिंगावर रुद्राभिषेक संत-महंतांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. कमलार्चन, बिलवार्चन, फलार्चन तसेच विविध फुलांचे पुष्पार्चन यावेळी केले जाणार आहे.
हिंदु धर्मात श्रावण महिन्याचे विशेष महत्व असल्याने कैलास मठात हा धार्मिक सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. विश्वात शांती नांदावी, सर्व नागरिक बंधु-भावाने व गुण्या गोविंदाने एकोप्याने नांदावे, देशसेवेसाठी सिमेवर लढणाºया सैनिकांचे मनोबल वाढावे, सर्वत्र पर्जन्यवृष्टी होऊन शेतकरी राजा सुखी व्हावा, यासाठी स्वामी संविदानंद सरस्वती यांच्यासह साधू-महंतांच्या प्रमुख उपस्थितीत श्रावणमास पुणार्हुती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात सोमवारी सकाळी ९ वाजता नाशिक ढोलपथकाचे ढोलवादन, शिवगर्जना, अभिषेक, आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर महामंडलेश्वर स्वामी संविदांनंद सरस्वती यांचे प्रवचन होणार असून, उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
