बालविवाहाच्या बाबतीत नाशिक जिल्हा ११ व्या क्रमांकावर!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २०२१ मध्ये जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बालविवाहमुक्त जिल्हा करण्यासाठी व त्याबाबत योग्य ते नियोजन, अंमलबजावणी व निर्णय या कृती दलामध्ये घेण्यात येत आहेत. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून, ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण ५ नुसार नाशिक जिल्ह्यात २९.६ टक्के बालविवाह होतात. तसेच, बालविवाहाच्या बाबतीत नाशिक जिल्हा ११ व्या क्रमांकावर आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्या जिल्हा कृती दल बैठकीतील सूचनांनुसार सक्षम बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य, पंचायत, शिक्षण महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभागामधील तालुकास्तरीय, तसेच क्लस्टरमधील अधिकारी व कर्मचारी अशा ७५ अधिका-यांना बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स प्रशिक्षण देण्यात आले.
डॉ. अर्जुन गुंडे यांनी प्रशिक्षणाचे उद्घाटन केले. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) वर्षा फडोळ, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बालकल्याण जि.प. नाशिक प्रताप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रवीण पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाने, एस.बी.सी.-३ संस्थापक तथा व्यवस्थापकीय संचालक निशित कुमार, आरकेएसके जिल्हा समन्वयक प्रीती मगर, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी समिरा येवले, तसेच एसबीसी ३ प्रकल्प प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बिडये, विकास कांबळे, श्रीकांत भोरे यांच्या हस्ते प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रताप पाटील, प्रमुख प्रशिक्षक निशित कुमार, नंदू जाधव, कृपाली बिडये यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना प्रशिक्षण दिले. समारोपप्रसंगी बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन शिंदे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. विकास कांबळे, श्रीकांत भोरे, कम्युनिकेशन समन्वयक रुचिका अहिरे यांनी प्रशिक्षण यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!