४९२२ कर्मचारी मतदान केंद्रावर आज होणार रवाना

४९२२ केंद्रांवर पोहोचणार मतदान यंत्रे
प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या ठिकाणी केंद्रांच्या संख्येनुसार १० टक्के राखीव मतदान पथके ठेवण्यात आली आहेत. जिल्ह्यात २४ हजार ६१० आणि २४६१ राखीव असे एकूण २७ हजार ७१ कर्मचारी निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी बीयू- ७०२६, सीयू- ५८९९ आणि ६३९१ व्हीव्हीपॅटची मदत घेण्यात येणार आहे. मतदान अधिकारी, कर्मचा-यांची मतदान केंद्रांवर ने-आण करण्यासाठी ५११ बसेस, ९१ मिनी बसेस आणि एक हजार १७ जीप या वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असून, जिल्ह्यातील १५ मतदारसंघांमध्ये प्रचाराची सोमवारी (दि. १८) सांगता झाली आहे. मतदान प्रक्रिया उद्यावर आली असून, ती सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. मंगळवारी (दि. १९) सकाळी ८ वाजता अधिकारी आणि कर्मचारी ईव्हीएम घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना होणार आहेत.
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत असून, बुधवारी (दि. २०) सकाळी ७ ते सायंकाळी ६ यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. महिनाभरापासून सुरू असलेल्या जाहीर प्रचाराची सोमवारी सायंकाळी ६ वाजता सांगता झाली. जाहीर प्रचार संपल्याने कोणत्याही उमेदवारास अथवा राजकीय पक्षांना आता कोणत्याही माध्यमातून जाहीर प्रचारास प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. प्रचारासाठी बाहेरून आलेल्या; परंतु संबंधित मतदारसंघात मतदान नसलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या मतदारसंघातील उपस्थितीवर बंदी असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!