आता रात्र वै-याची; प्रचाराच्या तोफा थंडावल्या!

नाशिक (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा अखेर सोमवारी (दि. १८) सायंकाळी थंडावल्या. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिका-यांनी आणि उमेदवारांनीही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत प्रचाराचे रान उभे केले होते. या आरोपांमुळे मतदारांचे काही प्रमाणात रंजन झाले असले तरी यापैकीच अनेक मुद्यांभोवती फिरलेल्या प्रचाराने आता उमेदवारांचे भवितव्य २० नोव्हेंबरला मतदान यंत्रात बंद होणार आहे. जाहीर प्रचार थंडावला असला तरी छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार असल्यामुळे ‘रात्र वै-याची, जागा राहा’ अशी काहीशी स्थिती आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यातील १५ विधानसभेच्या जागांकरता १९६ उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमवणार आहेत. या १९६ मधून किती उमेदवार विधानसभा गाठणार हे २० तारखेच्या मतदानावरच अवलंबून असेल. अर्थात, त्यासाठी अनेकांनी मतदारांना केलेले आर्जव तसेच पक्षांकडून झालेल्या प्रचारामुळे कोण बाजी मारणार आणि कोण धोबीपछाड खाणार? याकडे आता लक्ष लागून आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थ नाशिकच्या राजकीय आखाड्यात पहिलीच जाहीर सभा झाली ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची. यानंतर बहुतांश सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभांनी नाशिकचै मैदान चांगलेच गाजवले असून यात राष्ट्रवादी शरदचंगद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. पंकजा मुंडे, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत, अमोल कोल्हे, खा. सुप्रिया सुळे या स्टार प्रचारकांच्या सभांनी नाशिकच्या राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधात प्रचाराचे रान उठवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यातील कोणते मुद्दे मतदारांना भावतात हे येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणीनंतरच समोर येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!