नाशिक (प्रतिनिधी): सिडको भागात मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणा-या दोघा सराईतांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत ७१.५ ग्रॅम मॅफेड्रॉन व अन्य मुद्देमाल असा सुमारे ३ लाख ८७ हजार ५०० रूपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मॅक्स या अमली पदार्थ शोधक श्वानाच्या मदतीने शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.
पोलिसांनी दिलेल्या माहिती, रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्या (वय २८ रा.रूंग्ठा सफायर,चेतनानगर) व बाबू प्यारेलाल कनोजीया (वय ३५, रा. हेडगेवारनगर, त्रिमूर्ती चौक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांवर खुनासह विविध प्रकारचे गंभीर गुुन्हे दाखल आहेत. पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगर येथील महापालिका गार्डन भागात दोन युवक अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१३) दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई मॅक्स या अमली पदार्थ शोधक श्वानाच्या मदतीने करण्यात आली.
संशयितांच्या अंगझडतीत सुमारे ३ लाख ५७ हजार ५०० रूपये किमतीचा व ७१.५ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमलीपदार्थ मिळून आला आहे. पथकाने अमली पदार्थासह तीन मोबाईल असा सुमारे ३ लाख ८७ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोर्टाने संशयितांना शुक्रवार (दि.१८) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई सहायक निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, सहायक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, देवकिसन गायकर, संजय ताजणे हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अंमलदार अनिरूध्द येवले, बाळासाहेब नांद्रे, अविनाश फुलपगारे, योगेश सानप, चंद्रकांत बागडे, अर्चना भड तसेच श्वान पथकाचे हवालदार गेश कोंडे, किसन पवार व नाना बर्डे आदींच्या पथकाने केली.
