नाशिकमध्ये विविध कारणांमुळे तीन जणांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहराच्या विविध भागात विविध कारणांमुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आंघोळीसाठी मित्रांसह गांधी तलावात गेलेल्या दहा वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. तर वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहितेसह एका तरुणाने गळफास घेत जीवन संपविल्याची घटना समोर आली आहे. याबाबत म्हसरूळ, पंचवटी, गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूच्या नोंदी दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचवटीमधील रामकुंडाजवळील गांधी तलावामध्ये एक १० वर्षीय बालकाचा फुगलेला व तरंगत्या अवस्थेतील मृतदेह शनिवारी (दि. १) सायंकाळी मालेगाव स्टॅण्ड चौकी पोलिसांना आढळून आला. हा बालक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचे नाव आयुष शेवरे (वय १०, रा. राहुलवाडी, पेठ रोड, पंचवटी) असे आहे. मयत बालकाची आई गतिमंद असून, ती हॉटेलमध्ये कामास आहे. आयुष दोन दिवसांपूर्वी ओळखीतील मित्रांसह गांधी तलावात आंघोळीसाठी आला. तेव्हा तो पाण्यातून बाहेर आलाच नाही. त्याच्या सोबतचे मित्र आंघोळ करून, तसेच निघून गेले. मात्र, रात्र होऊनही तो घरी परतला नाही. ४८ तास शोधाशोध केली असता शनिवारी (दि. १) रात्री त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाल्याचे उघड झाले. याबाबत पंचवटी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, तपास हवालदार जी. एस. माळवाल करत आहेत. तर म्हसरूळ भागातील मखमलाबाद येथील काकड मळ्यात राहणा-या ३५ वर्षीय कविता देवकुमार गांगोडे (रा. भगवती नर्सरीजवळ) या विवाहितेने शनिवारी (दि. १) सकाळी गोठ्यात गळफास घेत जीवन संपविले. याबाबत हवालदार फुलपगारे तपास करत आहेत. तिस-या घटनेत गंगापूर पोलिस हद्दीतील सोमेश्वर मंदिरासमोर राहणा-या अविनाश जगन पवार (वय २३) याने शनिवारी सकाळी घरात बेडशिटने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून तपास सहायक उपनिरीक्षक गणेश पाटील करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!