सिटीलिंकचे भाडे वाढणार? 

नाशिक (प्रतिनिधी): एसटी महामंडळाच्या बसची भाडेवाढ लागू झाल्यानंतर आता सिटीलिंकनेही बस भाडेवाढीसंदर्भात राज्य परिवहन आयुक्तांना प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू केली आहे. सिटीलिंकचे सध्याचे तिकीट दर आधीच प्रवासी बसभाडे मूल्य दूरसूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे भाडेदरवाढीची कमाल मर्यादा वाढवून भाडेवाढीची परवानगी घेतली जाणार आहे.
सिटीलिंकच्या माध्यमातून सध्या २०० सीएनजी व ५० डिझेल अशा एकूण २५० बसेस शहर व लगतच्या ग्रामीण भागात सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत. बससेवेमुळे नाशिक महापालिकेला कोट्यवधी रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. सिटीलिंकने केलेल्या ठरावानुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान पाच टक्के भाडेवाढीची मुभा आहे. त्यानुसार सुरूवातीला जानेवारी २०२२ मध्ये पाच टक्के तर, जानेवारी २०२३ मध्ये सुमारे दहा टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाडेदरवाढ करण्यात करण्यात आली होती. मात्र ही भाडेवाढ शासनाच्या बस प्रवासी भाडेमूल्य दरसूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पोहोचल्याने जानेवारी २०२४ मध्ये सिटीलिंकला भाडेवाढ करता आली नाही. आता त्यातून मार्ग काढण्यासाठी सिटीलिंकने गृह व परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांना प्रस्ताव पाठवित भाडेदराची कमाल मर्यादा वाढविण्याची मागणी केली होती. मात्र या प्रस्तावाची दखल घेतली गेली नाही. आता राज्य परिवहन महामंडळाने एसटी भाढेवाढीचा निर्णय घेतल्याने सिटीलिंकने देखील भाढेवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
बस तिकीट दरासाठी शासनाच्या परिवहन खात्याने किमान व कमाल दराची सूची निश्चित केलेली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व महापालिका तसेच परिवहन महामंडळाच्या बसेसचे तिकीट दर निश्चित केले जातात. सिटीलिंकच्या मागणीनुसार तिकीट दराचे कमाल दर वाढविण्याची मागणी मान्य केली असती तर संपूर्ण राज्यासाठी नवीन दरवाढ लागू करावी लागली असती. आता एसटी महामंडळाच्या बसेसच्या भाडेदरात वाढ करण्यात आल्याने दरसूचीच्या कमाल मर्यादेत शासनाने केलेल्या बदलाबाबतच्या निर्णयाची माहिती सिटीलिंकने एसटीकडून मागविली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!