देवदर्शनासाठी निघालेली लक्झरी बस दरीत कोसळली; पाच भाविकांचा मृत्यू

सुरगाणा (प्रतिनिधी): देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांची लक्झरी बस दरीत कोसळून पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे, तसेच ४५ जण गंभीर जखमी असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी (दि. २) पहाटे साडेचार वाजेदरम्यान येथून जवळच असलेल्या गुजरातमधील सापुतारा घाटात ही दुर्घटना घडली. हे सर्व भाविक उत्तर प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्याच्या गुना, शिवपुरी भागातील रहिवासी आहेत.
उत्तर प्रदेश राज्यातील भाविक चार खासगी लक्झरी बसेसने दि. २३ डिसेंबर २०२४ रोजी देवदर्शनासाठी निघाले होते. महाराष्ट्रातील शिर्डी, नाशिक येथे देवदर्शन करून ते त्र्यंबकेश्वरला आले. तेथून देवदर्शन आटोपून रात्री उशिरा सापुतारामार्गे गुजरातमधील द्वारकेला निघाले. मध्यरात्रीनंतर या चारही बसेस सापुतारा येथे पोहोचल्या. याठिकाणी चहा-नाश्ता आटोपून सर्व भाविक साडेचार वाजेच्या सुमारास पुढील प्रवासासाठी निघाले. गुजरातमधील सापुतारालगत असलेला घाट उतरत असताना सापुतारा ते माळेगाव दरम्यान एक बस (यूपी ९२ एटी ०३६४) सुमारे ३० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात तीन पुरुष आणि दोन महिला अशा पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक, एजंटचा समावेश आहे, तर ४५ भाविक जखमी असून, त्यातील आठजण गंभीर आहेत.
मृत झालेल्या पाच जणांमध्ये रतनलाल देवीराम जाटव (वय ४१, रा. वशल्ला, मध्य प्रदेश), भोलाराम कोसाराम कुशवाह (वय ५५, रा. रामगढ, मध्य प्रदेश), गुड्डीबेन राजेशसिंह यादव (वय ६०, रा. रामगढ), बिजेंद्रसिंह बादलसिंह यादव (वय ५५, रा. बिजरऊनी, भादरवाड), कमलेशाबाई बिसपालसिंह यादव (वय ६०, रा. रामगढ) यांचा समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच सापुतारा पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, तसेच डांग येथील आरोग्य विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दरीतून सर्व भाविकांना बाहेर काढले. किरकोळ जखमी असलेल्या भाविकांना शामगव्हाण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर असलेल्या भाविकांवर अहवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!