नाशिक जिल्ह्यात आरटीईसाठी पाच हजारपैकी केवळ ६७३ प्रवेश!

नाशिक (प्रतिनिधी): आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांसाठी पहिल्या यादीत पाच हजार तीन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना येत्या २८ तारखेपर्यंत प्रवेशाची संधी असणार आहे. सोडत जाहीर होऊन आठ दिवस झाले, तरी जिह्यात आतापर्यंत फक्त ६७३ विद्यार्थ्यांनीच आपले प्रवेश निश्चित केले आहेत.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांना पहिली ते सातवीपर्यंत ह्यआरटीईह्ण अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागामार्फत मोफत प्रवेश दिला जातो. नाशिक जिल्ह्यात ४०७ शाळांमध्ये पाच हजार २९६ रिक्त जागा आहेत. त्यासाठी १७ हजार ३८५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच हजार तीन विद्यार्थ्यांना पहिल्या यादीनुसार प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे, तर २९३ जागांसाठी विद्यार्थ्यांनी मागणी न केल्यामुळे या जागा रिक्त राहणार आहेत.
पहिल्या यादीत स्थान मिळालेल्या पालकांना त्यांच्या मोबाइलवर मेसेज प्राप्त झाला आहे. आनलाईन अर्ज भरताना सादर केलेली माहिती व कागदपत्रांची पडताळणी चौकशी समिती करते. नाशिक शहरात चार ठिकाणी चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. मुख्य शहरातील शाळांसाठी मविप्र समाज शिक्षण संस्थेच्या होरायझन शाळेत ही समिती कार्यरत आहे, तर सातपूर व सिडको भागातील शाळांसाठी गुरू गोविंदसिंग शाळेत ही समिती कागदपत्रांची पडताळणी करते. याप्रमाणे नाशिकरोड व पंचवटी भागातील शाळांसाठी दोन समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करत आतापर्यंत ६७३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित केले.
राज्यातील ८८६३ शाळांमध्ये १ लाख ९०८७ जागा आरटीईसाठी सोडण्यात आल्या आहेत. यासाठी ३ लाख ५१५२ अर्ज दाखल झाले आहेत. सोडतीमध्ये १ लाख १९६७ विद्यार्थ्यांना सोडत लागली आहे. गेल्या आठवडाभरात फक्त १३ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. पहिल्या यादीतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी मार्चमध्ये दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पहिल्या नियमित यादीसाठी प्रवेश घेता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!