महिनाभरापासून बिबट्याचा धुमाकूळ वासराचा पाडला फडशा!

विंचूर (प्रतिनिधी): हनुमाननगर येथे बिबट्याने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वासरावर हल्ला करून बिबट्याचा फाडशा पाडल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पशूपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हनुमाननगर येथील शेतकरी दीपक साहेबराव गुंड शनिवारी (दि. २२) रात्री झोपलेले असताना त्यांच्या गायीच्या वासरावर बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पाडला. त्यानंतर सकाळपर्यंत बिबट्या वारंवार त्या ठिकाणी फिरून येत होता. त्यामुळे या भागातील पाळीव जनावरांची सुरक्षा धोक्यात असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. ज्ञानेश्वर भडांगे यांनी वनविभागाला ही माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी जाधव यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वन विभागाच्या अधिकाºयांनी लवकरात लवकर या भागात पिंजरा लावून या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हनुमाननगर येथील नागरिकांनी केली आहे.
हनुमाननगर परिसरात सध्या द्राक्ष, कांद्याची काढणी सुरू आहे. त्यामुळे अनेकदा शेतकरी सायंकाळी उशिरापर्यंत शेतावर थांबतात. त्याचप्रमाणे रात्रीच्या सुमारास पिकांना पाणी देण्यासाठीही शेतक-यांना शेतात जावे लागते, अशातच परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, परिसरातील काही शेतक-यांना बिबट्याचे दर्शनही झाले आहे. त्यामुळे शेतक-यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!