नाशिक (प्रतिनिधी): रुग्णालयात घडणा-या घटनांमुळे पारिचारिकांसह कर्मचा-यांना दहशतीखाली वावरावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाने कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा तैनात करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा नर्सेस असोशिएशनच्या वतीने करण्यात आली. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करीत संघटनेच्यावतीने याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक चारूदत्त शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील आपात्कालीन कक्षात रविवारी (दि.२३) दोन गट परस्परांविरोधांत भिडले. दोन्ही गटांकडून वीट, दगड, रुग्णालयातील खुर्च्या आदी सामानाचा वापर झाला. या घटनेने रुग्णालयीन कर्मचा-यांमध्ये दहशत पसरली असून प्रचंड गदारोळ सुरू असताना या ठिकाणी रुग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच नर्सेस आणि रुग्णालयीन कर्मचारी भयभीत झाले होते. अचानक उद्भवलेल्या याप्रसंगात सुरक्षा रक्षकांचाही निभाव लागला नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी एकत्र येत जिल्हा रुग्णालयात वाद करणा-या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने पारिचारीका सहभागी झाल्या. कर्मचा-यांच्या मागण्यांबाबत योग्य ती पाऊले उचलली न गेल्यास संघटनेच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
