क्रिकेट न्यूज : स्टार फलंदाज विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर (८४ धावा) लोकेश राहुलच्या जबाबदार नाबाद ४२ धावांच्या बळावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मंगळवारी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा ११ चेंडूआधी चार गडी राखून पराभव करीत पाचव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. विराट सामनावीर ठरला.
दरम्यान, दुसरा उपांत्य सामना आज बुधवारी दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड यांच्यात लाहोर येथे खेळला जाईल. यातील विजयी संघ येत्या रविवारी दुबई येथे भारताविरुद्ध फायनलमध्ये खेळेल.
ऑस्ट्रेलियाला ४९.५ षटकांत २६४ धावात रोखणाऱ्या भारतीय संघाने विजयी लक्ष्य ४८.१ षटकांत ६ बाद २६७ असे गाठले. कर्णधार रोहित शर्मा (२८), उपकर्णधार शुभमन गिल (८), श्रेयस अय्यर (४५) आणि अक्षर पटेल (२७) यांच्या बळावर भारताने २६५ धावांचा पाठलाग करताना ४३ व्या षटकांत अखेरच्या चेंडूवर विराट कोहली बाद झाला तेव्हा ५ बाद २२६ अशी मजल गाठली. संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणणाऱ्या विराटने ॲडम झम्पाच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी ९८ चेंडूत ५ चौकारांसह ८४ धावा ठोकल्या. राहुलने ३४ चेंडूत २ चौकार आणि दोन षटकारांसह ४२ धावांचे योगदान दिले. रवींद्र जडेजा २ धावांवर नाबाद राहिला. अखेरच्या ४२ चेंडूत ३९ धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने २४ चेंडूत तीन षटकारांसह झटपट २८ धावा केल्या.
त्याआधी, मोहम्मद शमीचे तीन तर रवींद्र जडेजा तसेच वरूण चक्रवर्ती यांच्या २-२ बळींमुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि ॲलेक्स कॅरी यांच्या चिवट अर्धशतकानंतरही ऑस्ट्रेलियाला सर्वबाद २६४ धावांपर्यंतच मजल गाठता आली. स्मिथने नाणेफेक जिंकल्यानंतर ९६ चेंडूत ७३ धावा केल्या. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य सामन्यात विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक झेल घेण्याचा नवा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ३३५ झेल घेऊन त्याने राहुल द्रविडला मागे टाकले. द्रविडने कारकिर्दीत ३३४ झेल घेतले होते.
