नाशिक बाजार समितीत सभापती पिंगळेंविरोधात बंड!
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक कृउबा समितीचे सभापती देवीदास पिंगळे मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप त्यांच्याच गटातील बारापैकी नऊ संचालकांनी केला आहे. या नऊ संचालकांनी माजी सभापती शिवाजी चुंभळे गटाशी हातमिळवणी केली आहे. विरोधी गटातील सहा व सत्ताधारी गटातून फुटलेले नऊ अशा १५ संचालकांनी सोमवारी (दि. ३) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. यावेळी सभापती चुंभळे यांच्यावर अविश्वास दाखल करण्याबाबत बैठक बोलवावी, अशा मागणी केली. त्यानुसार, दि. ११ मार्च रोजी संचालक मंडळाची बैठक होणार आहे. दगाफटका नको म्हणून हे १५ संचालक सहलीला रवाना झाले आहेत.
दि. २८ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत पिंगळे गटाला १२, तर शिवाजी चुंभळे यांच्या गटाला सहा जागा मिळाल्या. त्यानंतर सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत चुंभळे गटाने अर्ज दाखल न करता, पिंगळे गटाला बिनविरोध निवडणूक पार पाडण्यासाठी मदत केली. मात्र, दोन वर्षेही पूर्ण होत नाहीत, तोच पिंगळे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या गटातील नऊ संचालक बाहेर पडले आहेत.
सभापती देवीदास पिंगळे यांच्या गटाच्या उपसभापती सविता तुंगार, संपत सकाळे, विनायक माळेकर, भास्कर गावित, जगन्नाथ कटाळे, युवराज कोठुळे, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे आणि संदीप पाटील अशा नऊ संचालकांनी विरोधात जात, चुंभळे गटातील सहा संचालकांना बरोबर घेत पिंगळे यांच्या सत्तेला सुरुंग लावला आहे. या नऊ संचालकांसह चुंभळे गटातील शिवाजी चुंभळे, तानाजी करंजकर, प्रल्हाद काकड, धनाजी पाटील, राजाराम धनवटे, कल्पना चुंभळे असा एकूण १५ संचालकांचा गट पिंगळेंविरोधात आता सक्रिय झाला आहे. त्यामुळे पिंगळे यांच्या गटात त्यांच्यासह उत्तमराव खांडबहाले आणि निर्मला कड असे केवळ तीनच संचालक उरले आहेत.
देवीदास पिंगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे आहेत; तर शिवाजी चुंभळे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय शीतयुद्ध सुरू झाल्याबाबत या घटनेकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे. पिंगळे विरुद्ध चुंभळे यांची लढाई आता नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भविष्यावर मोठा परिणाम करणारी ठरू शकते.
बाजार समितीत सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे. जे काही घडत आहे ते पैशांच्या जोरावर घडत आहे. शिवाजी चुंभळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि हे प्रकार सुरू झाले. अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी प्रत्येक संचालकाला ५० लाख रुपये आणि पोलिस बंदोबस्त देऊन फोडण्यात आले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहे.– देविदास पिंगळे, सभापती, नाशिक कृउबा
बाजार समितीत संचालकांचे कोणतेही काम होत नाही. साधे प्रोसिडिंग सुद्धा बघायला मिळत नाही. केवळ सह्या करायच्या आणि निघून जायचे, असा प्रकार सुरू होता. शेतक-यांना देखील कोणत्याही सुविधा मिळत नाही. एखादे स्वच्छतागृह बांधायचे तरी उपसभापतीला त्याचा अधिकार नाही.– विनायक माळेकर, उपसभापती
बाजार समितीत शेतकरी, व्यापारी वर्गाला कोणत्याही सुविधा मिळत नाही. पिण्यासाठी स्वच्छ पाणी देखील उपलब्ध नाही. याबाबत मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि सदर प्रकार त्यांच्या कानावर घातला. सभापतींच्या मनमानीमुळे इतर संचालक देखील त्यांच्या कारभाराला कंटाळल्याने ते माझ्याकडे आले आणि अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.– शिवाजी चुंभळे, माजी सभापती
