उपनगर येथे देशी बनावटीच्या दोन कट्ट्यांसह सराईत गजाआड

नाशिक (प्रतिनिधी): जिवंत काडतुसांसह देशी बनावटीच्या कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने एक सराईत उपनगर येथील मनपा इमरतीच्या परिसरात आला असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या. सचिन ओमचंद कागडा असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून दोन देशी कट्ट्यांसह दोन जिवंत काडतुसेही जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.१६) गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अमलदार पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार प्रदीप म्हसदे व पोलीस नाईक विशाल देवरे यांना रेकॉर्डवरील संशयित गुन्हेगार सचिन कागडा हा उपनगर मनपा बिल्डिंगसमोर देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा) विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, पोलीस हवालदार विशाल काठे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल देवरे, प्रशांत मरकड व चालक समाधान पवार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या आधारे उपनगर मनपा बिल्डिंगसमोर सापळा लावून सचिन ओमचंद कागडा (वय २५, रा. उपनगर, मनपा हॉस्पिटल शेजारी) याच्या मुसक्या आवळल्या. यावेळी पोलिसांनी त्याची झडती घेतली. यात त्याच्या ताब्यातून दोन देशी बनावटीच्या पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा सुमारे ६१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, संशयिताविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार प्रतिबंध व महाराष्ट्रपोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!