सटाणा (प्रतिनिधी): येथील व्यापारी संकुलातील शुटींग शर्टींगच्या दालनातून कामाला असलेल्या नोकरांनीच दुकानातील महागडे ड्रेस मटेरीयलसह साड्या असा एकूण ४० लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दुकानमालकाने सटाणा पोलिसांत तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीच्या चित्रिकरणावरून पोलिस चोरट्यांच्या शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापड व्यापारी संकुल शोभाराम बुधाराम चौधरी यांचे सटाणा शहरात व नामपूर येथे साडी विक्रीची दुकाने आहेत. दोन्ही ठिकाणी लक्ष देणे कठीण होत असल्याने चौधरी यांनी दुकानात गावाकडचीच दोन मुले कामाला ठेवली. या दोन्हीं मुलांनी चौधरी यांचा विश्वास संपादन करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत आयशर वाहनातून नऊवार, सहावार साड्यांसह शुटींग, शर्टींग व इतर वस्त्रे चोरून नेल्याची माहिती चौधरी यांनी पोलिसांत दिली. चौधरी यांच्या फिर्यादीनुसार दिनेश केसाराम देवाशी व दशरथ सिंग रावणा (दोन्ही रा. जि. जालोर, राजस्थान) अशी संशयितांचनी नावे असून या दोघांविरोधात ४० लाखांच्या साड्यांसह विविध प्रकारचे कपडे चोरल्याप्रकरणी सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार करीत आहेत.
