नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील रायगड चौकात पाणी टंचाई संपत नाही तोच आता ड्रेनेज मिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. गढुळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्यात अळ्या आढळून आल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आरोग्य धोक्यात आले असून पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराविषयी रोष व्यक्त केला जात आहे.
नवीन नाशिक परिसरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची ओरड सुरू आहे. वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने आंदोलने देखील झाली. त्याची दखल घेत पंधरा दिवसांपुर्वी मनपा आयुक्तांनी परिसरात पाहणी केली. मात्र, तरीही अद्याप प्रश्न प्रश्न सुटलेला नाही. असे असतानाच आता रायगड चौक परिसरात काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवूनही दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दुषित पाण्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त असलेले हे पाणी तीन-चार वेळा गाळून घ्यावे लागत असल्याचे महिलांनी सांगितले. याप्रकरणी संबंधितांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा योगेश गांगुर्डे, आरती हिरे, सपना चौधरी, सुवर्णा सोनवणे, वैशाली काकळीज, छाया पुरे, दीपाली केजरे, संगीता शिंदे यांनी दिला आहे.
