पावसाने लावली शहरासह जिल्हाभरात हजेरी!

वादळी वारा अन् वीज पडून जीवित हानी, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित

नाशिक (प्रतिनीधी) : दिवसभर ढगाळ आणि दमट वातावरणानंतर रविवारी (दि. ९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास नाशिक शहरात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दिवसभर घामाघूम झालेल्या नाशिककरांना काहीसा दिलासा मिळाला. मालेगाव, देवळा, येवला, सिन्नर, निफाड, पिंपळगाव बसवंत परिसरातही वादळी वाºयासह पाऊस पडला. दरम्यान, तीसगाव येथे वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर उमराणे येथे छत कोसळून एकाचा बळी गेल्याची घटना घडली. वादळी वा-यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, तर ठिकठिकाणी विद्युतपुरवठा खंडित झाला होता.

 

पिंपळगाव परिसरात जोरदार तडाखा

शुक्रवारनंतर शनिवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी पिंपळगाव परिसरात पुन्हा दणका दिला. वादळी वारा अन् विजेच्या कडकडाटासह रात्री आठ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर झालेल्या या जोरदार पावसामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला असला, तरी वादळी वा-यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, शुक्रवारी (दि. ७) वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाने पिंपळगाव बसवंत परिसराला अक्षरश: झोडपले होते. जोरदार झालेल्या या पावसाने शहरात कुठे घरासह शाळांचे छप्पर उडाले, तर कुठे कांदा शेड पडले होते; शिवाय जोरदार पावसाने रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने शहराचा वीजपुरवठा तब्बल २४ तासांहून अधिक काळ खंडित होता. शनिवारी (दि.९) एक दिवसाच्या विश्रांतीनंतर रविवारी संध्याकाळी पुन्हा वादळी वारा अन् मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने तब्बल तासभर हजेरी लावल्याने शहराचा वीजपुरवठा पुन्हा खंडित करण्यात आल्याने पिंपळगावकरांनी महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

 

खामगाव पाटी येथे सोलरवर वीज पडून नुकसान

येवला तालुक्यात अनेक गावांमध्ये वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील खामगाव पाटी येथील शेतकरी साहेबराव कदम यांच्या शेतात असलेल्या सोलरवर वीज पडून नुकसान झाले. कृषी पंपास वीज उपलब्ध होत नसल्याने कदम यांनी सोलर प्लांट बसवला होता. दरम्यान, येवला शहरासह परिसरात पावसाने हजेरी लावली असून, तालुक्यातील नगरसूल परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसला असून, यावेळी अनेक ठिकाणी शेतात देखील पाणी साचल्याचे चित्र यावेळी दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!