तुषार रौंदळ,
सटाणा (प्रतिनिधी): भंडारपाडा व वनोली शिवारातील जंगल परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. भंडारपाडा येथील शेतकरी सुदर्शन बापू देवरे यांच्या गाभण गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच शेतातील पशुधनावर तीन महिन्यांपूर्वीही हल्ला झाला होता.
शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांचे अशा हल्ल्यांमुळे मोठे नुकसान होत आहे. एका बाजूला अवकाळी पावसाने झालेले पीक नुकसान व कांद्याचे पडलेले भाव; आणि दुसऱ्या बाजूस जंगली प्राण्यांचे मानवी वस्तीत वाढलेले शिरकाव—यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बिकट परिस्थिती झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच राकेश घोडे (निसर्ग प्राणी मित्र, बागलाण) यांनी वनविभागाला कळवले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले यांच्या उपस्थितीत वनपाल हरी अहिरे यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली. पंचनाम्यावेळी विश्वास गुंमाडे व यशवंत सोनवणे उपस्थित होते. स्थानिक शेतकऱ्यांनी तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली असून पुढील हल्ले टाळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आवाहन केला आहे.
नागरिकांनी घ्यावी खबरदारी
“जंगल परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे. रात्री बाहेर पडणे टाळावे. गरज असल्यास टॉर्च, मोबाईलचा आवाज, रेडिओचा वापर करावा. तसेच अंधारानंतर लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नये.”
राकेश घोडे, निसर्ग प्राणी मित्र, बागलाण
