धक्कादायक! सटाणा–साक्री रोडवर अज्ञात वाहनाची दहशत; दुर्मिळ तरसाचा मृत्यू

वन्यजीव संरक्षणाच्या गप्पा हवेतच? प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आणखी एक बळी!

तुषार रौंदळ
सटाणा (प्रतिनिधी): 
वन्यजीव संरक्षणाच्या घोषणा, जनजागृतीचे फलक आणि कागदोपत्री उपाययोजना यांचा बुरखा पुन्हा एकदा फाटला आहे. सटाणा–साक्री महामार्गावर विरगाव परिसरात एका दुर्मिळ तरसाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शुक्रवार (दि. ३०) रोजी पहाटेच्या सुमारास वीरगावजवळील रायबा हॉटेल परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. रस्ता ओलांडत असताना वेगात धावणाऱ्या अज्ञात वाहनाने तरसाला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या दुर्मिळ प्राण्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने नेमकी कोणती ठोस पावले उचलली? असा सवाल उपस्थित होत आहे. सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला मृत तरस आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. त्यानंतर सटाणा वनपरिक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ आमले, वनरक्षक ममता बोडके, कृष्णा काकुळते आणि वनमजूर किरण भामरे यांचा समावेश होता. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. पाईकराव यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर प्राण्याच्या शवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घटनास्थळी उद्धव निकम, अशोक सोनवणे, हिरा गांगुर्डे, नितीन सोनवणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. मात्र, अपघात घडवून पसार झालेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलीस व परिवहन यंत्रणेकडून कोणती कारवाई होणार? सीसीटीव्ही, स्पीड ब्रेकर, सूचना फलक फक्त कागदावरच आहेत का? असे संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

वन्यप्राणी धोक्यात, प्रशासन बेफिकीर!
या मार्गावर वन्यप्राण्यांच्या वावराची माहिती असूनही वेगमर्यादा, रिफ्लेक्टर, अंडरपास किंवा ‘वाइल्डलाईफ क्रॉसिंग’सारख्या उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? दरवेळी अपघातानंतर “सावधगिरी बाळगा” असे आवाहन करून प्रशासन जबाबदारी झटकत आहे का, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

वनविभागाने वाहनचालकांना रात्री व पहाटे सावधपणे वाहन चालवण्याचे आवाहन केले असले तरी, फक्त आवाहनांवर वन्यजीवांचे प्राण अवलंबून ठेवणार का? असा सवाल आता जनतेतून होत आहे. अन्यथा, आज तरस… उद्या आणखी कोण?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!