सातपूर (प्रतिनिधी): शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे ठाण मांडत व्यवसाय करणा-या विक्रेत्यांच्या अतिक्रमित बांधकामावर मनपाच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी (दि.११) बुलडोझर चालवत अतिक्रमण जमीनदोस्त केले. मोहिमेत दोन ट्रकभर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ध्रुवनगर, शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील रस्त्यावर व्यवसाय करणा-या अतिक्रमणधारकांना सूचना देऊनही अतिक्रमण न काढल्याने सकाळी ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. चायनीज, पाव वड्याच्या गाड्या, इतर छोटा टप-या बॅनर व दिशादर्शक फलक या मोहिमेत जप्त करण्यात आले. दुकानाबाहेर केलेले पक्के बांधकाम व शेड त्वरित काढण्याच्या सूचना करत ही कारवाई पुढे सुरूच राहणार असल्याचे अतिक्रमण विभागाने सांगितले. सातपूर विभागीय अधिकारी अंबादास गर्कल, अतिक्रमण पथकप्रमुख तानाजी निगळ, प्रवीण बागूल, भगवान सूर्यवंशी, प्रदीप जाधव, श्याम ठाकरे, सातपूर व गंगापूर पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले. नागरिकांनी सर्व ठिकाणचे अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले.
