नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा व पालखेड धरण समूहातील पाणी नांदूरमधमेश्वरमार्गे पुढे जायकवाडी धरणाकडे मार्गस्थ होते. मुसळधार पावसाने मागील २४ तासांत जायकवाडीला चार हजार तीन दशलक्ष घनफूट म्हणजे चार टीएमसीचा विसर्ग झाला आहे. दि. १ जूनपासून दि. ४ जुलै रोजी सकाळपर्यंत जायकवाडीला सहा हजार ४६४ दशलक्ष घनफूट म्हणजे ६.४ टीएमसी पाण्याचा विसर्ग झालेला होता. सोमवारी सकाळी हंगामातील आतापर्यंतची आकडेवारी साडेदहा टीएमसीवर पोहोचल्याचे पाटबंधारे विभागाच्या अहवालात म्हटले आहे.
नाशिक (प्रतिनिधी) : सलग दोन दिवस सुरू असलेल्या पावसाचा जोर ओसरल्याने जिल्ह्यातील धरणांमधील विसर्ग कमी करण्यात आला आहे. गंगापूर, दारणा, कडवा धरणासह नांदूरमधमेश्वर बंधाºयातून सुरू असलेला विसर्ग सोमवारी (दि. ५) टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आला. शहरात सोमवारी सायंकाळी ५.३० पर्यंत ०.९ मिमी पाऊस नोंदविला गेला. पावसाने उघडीप दिल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. या हंगामात नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून जवळपास १० हजार ४६७ दलघफू पाणी मराठवाड्यातील जायकवाडीसाठी सोडले गेले आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर वाढला. पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. ३) रात्री उशिरापर्यंत मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने सकाळपासून सुरू केलेला विसर्ग जलसंपदा विभागाने टप्प्याटप्प्याने वाढवीत नेला. गंगापूर धरणातून रात्री आठ हजार क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याने गोदावरीला हंगामातील पहिला पूर आला. याशिवाय दारणा धरणातूनही २२ हजार ३८३ क्यूसेकने विसर्ग सुरू होता. या दोन्ही धरणांमधील पाण्याचा प्रवाह नांदूरमधमेश्वर बंधाºयापर्यंत पोहोचत असल्याने तेथून ५४ हजार क्यूसेकने मराठवाड्याकडे विसर्ग करण्यात आला. परंतु, रविवारी (दि. ४) मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्याने आठ धरणांतील विसर्ग कमी करण्यात आला आहे. रविवारी सायंकाळी गंगापूर धरणातील आठ हजार क्यूसेकवर पोहोचलेला विसर्ग सोमवारी सकाळी दोन हजार क्यूसेकपर्यंत कमी करण्यात आला. त्यामुळे दुथडी भरून वाहणा-या गोदावरीची पातळी लक्षणीय कमी झाली.
गंगापूर धरणातून विसर्ग करण्यात आल्याने यंदा प्रथमच गोदावरीचे पाणी पात्राबाहेर गेले. रविवारी सायंकाळी गोदावरीच्या पाणी पातळीतील वाढीचे निदर्शक मानल्या जाणा-या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आले होते. दिवसभर पावसाचा कायम राहलेला जोर रात्री कमी झाला. अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे रात्रीपासून गंगापूरसह बहुतांश धरणातील विसर्ग टप्प्याटप्याने कमी करण्यात आला. सोमवारी सकाळी भाममधून ४३७०, पालखेडमधून १५०२ क्यूसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली. गोदावरीच्या होळकर पुलाखालील पातळीत सकाळी सुमारे दीड हजार क्यूसेकने घट झाली असून, विसर्ग कमी झाल्याने ती आणखी घटणार आहे.
