अतिक्रमणे हटवा, रस्ते व फुटपाथवरील पादचारी मार्ग मोकळा करण्याचे आदेश

नाशिक (प्रतिनिधी): आगामी नवरात्रोत्सव आणि त्यानंतर येणा-या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह परिसरात उपनगरांमधील बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी पाहता तेथे दररोज स्वच्छता करण्याबरोबरच संबंधित भागांमधील अतिक्रमणे हटवून रस्ते व फुटपाथवरील पादचारी मार्ग मोकळे करा, असे आदेश मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत.
आयुक्त डॉ. करंजकर यांनी खातेपमुखांच्या घेतलेल्या बैठकीत विविध सूचना करण्यात आल्या असून, त्याची अंमलबजावणी न करणा-या अधिका-यांवर कारवाईचा इशारा दिला आहे. शहरातील शालिमार, रविवार कारंजा, भद्रकाली, तसेच मेनरोड या भागात प्रमुख बाजारपेठ आहे. सण, उत्सवाच्या कालावधीत येथे चालण्यासाठीदेखील जागा नसते. रस्त्यांलगत आणि फुटपाथवरदेखील अतिक्रमणे होत असल्याने पादचा-यांना मार्ग मोकळा राहात नाही, तर दुसरीकडे वाहने पार्किंगसाठीदेखील नागरिकांना कसरत करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शहरातील बाजारपेठांच्या ठिकाणी होत असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर स्वच्छता ठेवणे व कच-यांचे नियमित संकलन करण्याची सूचना दिली आहे.
शहरातील मुख्य रस्ते, चौकांमध्ये केबल्स, तसेच विद्युत तारा लोंबकळताना दिसून येत आहेत. या तारा तसेच केबल्समुळे अपघात घडण्याची शक्यता असल्याने त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील अनेक सिग्नल यंत्रणा बंद पडत असल्याने त्याबाबतही विद्युत विभागाने वेळोवेळी पाहणी करून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.
ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्ही
गोदावरी नदीसह तिच्या उपनद्यांच्या काठावर, तसेच रस्त्यांलगत ठिकठिकाणी बांधकामांचा राडारोडा (डेब्रीज) टाकला जात असल्याने प्रदुषणात वाढ होते, तसेच शहराच्या सौंदर्यीकरणालाही बाधा होत असल्याने संबंधित ठिकाणांची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, तसेच अशा ठिकाणी निश्चित करून त्याठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश घनकचरा व्यवस्थापन विभाग, गोदावरी संवर्धन कक्ष, तसेच विद्युत विभागप्रमुखांना दिले आहेत.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!