नाशिक (प्रतिनिधी): नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीला मुहूर्त मिळाला आहे. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा आराखड्याच्या आढाव्यासंदर्भात येत्या शुक्रवारी (दि. १७) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच जलसंपदामंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष आढावा बैठकीसाठी राज्याच्या मुख्य सचिवांसह सिंहस्थाशी संबंधित २३ उच्चस्तरीय अधिकाºयांना निमंत्रित करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या अनषंगाने दि. १४ डिसेंबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ४५ सदस्यांच्या शिखर समितीसह मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती, पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय, तसेच जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कार्यकारी समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर महापालिकेसह विविध शासकीय विभागांनी सिंहस्थ कुंभमेळा तयारीसाठी स्वतंत्र आराखडा तयार केला आहे. महापालिकेचा सिंहस्थ आराखडा आता १६ हजार कोटींवरून सात हजार ७६७ कोटींवर आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या सार्वजनिक बांधकाम, पोलिस, जिल्हा परिषद, जलसंपदा, नाशिक महानगर विकास प्राधिकरणासह विविध विभागांचाही आराखडा साडेसात हजार कोटींपर्यंत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी महाकुंभसंदर्भात मुंबईत बैठक घेत मनपाच्या आराखड्याची माहिती घेतली होती.त्यानंतर आता शुक्रवारी (दि. १७) मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिंहस्थांशी संबधित सचिव, अतिरिक्त सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षकांसह तब्बल २३ अधिका-यांना या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
