प्रत्येकवर्षी १ जून ते १ जुलै ई-केवायसी अनिवार्य!
नाशिक (प्रतिनिधी): मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना आता दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी प्रक्रिया करणे अनिवार्य करण्यात आले आहे. बदललेल्या निकषानुसार, लाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येकवर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान केली जाणार आहे. यामुळे महिलांच्या अर्जाची व त्यांनी दिलेल्या माहितीची सत्यता पडताळली जाणार आहे. या पडताळणीत जवळपास १ लाख ८० हजार अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ४१ महिलांनी योजनेचा लाभ सोडला आहे.
राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत तपासणी सुरू असताना, निकषात न बसणारे अर्ज बाद होणार असल्याची चर्चा राज्यभर आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे १५ लाख ७० हजार महिला या योजनेचा लाभ घेत असून, त्यातून दुहेरी लाभ घेणा-या सुमारे लाखभर महिला आणि निकषात न बसणाºया ८० हजार, अशा एकूण १ लाख ८० हजार महिला योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ४१ महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज दाखल केले असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने दिली.
अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येत आहे. त्यामुळे ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे, अशा महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. मात्र, आर्थिकदृष्टया सक्षम असतानाही अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केले आहे. सरकारी नोकरी, चारचाकी असणे, मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असणाºया महिला तथा अन्य शासकीय योजनेचा लाभ घेणा-या बहिणींना नाव वगळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. शासनाच्या आदेशानंतर फेरपडताळणी सुरू होणार आहे. मात्र, त्यापुर्वी महिलांनी स्वयंस्फूर्तीने योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महिला बालविकास विभागातर्फे करण्यात आले आहे.
