नाशिक (प्रतिनिधी): मकर संक्रांतीच्या दिवशी पोलिसांनी नायलॉन मांजा विरुध्द मोहीम राबवून ३४ जाणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचे १७ गुन्हे दाखल केले. त्यातील ३१ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संबंधितांकडून कारसह सव्वाचार लाख रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला.
नायलॉन मांजापासून नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या जीविताचे संरक्षण व्हावे, तसेच नायलॉन मांजा वापराला प्रतिबंध व्हावा, याकरिता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबविण्यात आली. नायलॉन मांजा व ज्या मांजावर काचेची धारदार व टोकदार कोटिंग केलेली आहे, अशा मांजाची विक्री, खरेदी, वापर, साठा यावर बंदी घालण्यात आली आहे.
मंगळवारी (दि.१४) संपूर्ण शहर पोलीस दल रस्त्यावर उतरले होते, तसेच, पोलीस पथकांनी थेट इमारतींवर जाऊन पाहणी केली. यात मांजा विक्री करणारे, तसेच नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणाºयांचा शोध घेण्यात आला. या कारवाईत मुंबई नाका- १, अंबड- ४, इंदिरानगर- ७, उपनगर- ३, नाशिकरोड- १, देवळाली कॅम्प- १ असे भारतीय न्यायसंहिता कलम ११० अन्वये सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याने १६ व एकाच्या मृत्यूप्रकरणी १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. १७ गुन्ह्यांमध्ये ३४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, त्यात दोन विधिसंघर्षित बालकासह एका पालकाचा समावेश आहे. दिवसभराच्या कारवाईत एक लाख तीन हजार ७०० रुपये किमतीचे १२९ गट्टू व मांजाच्या वाहतूक प्रकरणी एक कार असा सुमारे चार लाख १३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात मांजाविरोधी कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, आतापर्यंत ११८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येऊन तब्बल १५ लाख २४ हजार ५०० रुपये किमतीचे एक हजार ४५६ गट्टू हस्तगत करण्यात आले आहेत.
