मनपा विभागीय अधिकाऱ्यांसह सातपूर पोलीसांना निवेदनद्वरे १५ दिवसांचा अल्टीमेटम
सातपूर (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील कच्चा रस्ता पक्का होण्याची वाट बघणाऱ्या अशोकनगर येथील संतप्त रहिवाशांनी अशोकनगर संघर्ष समितीची स्थापना केली असून पंधरा दिवसात रस्ता तयार न झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी (दि.२८) सकाळी समितीच्या वतीने विभागीय अधिकाऱ्यांसह सातपूर पोलिसांना निवेदन दिले.
अशोकनगर येथील गट नं. ५१४ (अ) मधून जुना वासाळी रस्ता जात असून त्यापुढील गट नं. ५१४(ब) प्लॉट नं. ३२, ३३ व ३८ या प्लॉटवर नाशिक महानगरपालिकेने जुना वासाळी रस्ता गृहीत धरुन रहिवाशी झोनमध्ये प्लॅनची मंजूरी देवून काम पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे. हा जुना वासाळी रस्ता पुढे जावून गट नं. ४९३/४ ला जावून मिळतो. त्यापुढे असलेले गट नं. ४९२ व ४९१ यांनाही हा रोड सोईस्कर असल्याने तो रस्ता होणे गरजेचे आहे. यासाठी परिसरातील नागरिक गेल्या १० वर्षांपासून अनेक पत्र, अर्ज व स्मरणपत्र करत आहे. मात्र मनपाकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. या रस्त्याने हजोरो नागरिक ये-जा करतात. मात्र त्या ठिकाणी मोठमोठे दगड व खडे पडलेले असून अपघातांना आमंत्रण ठरत आहे.त्या कच्या रस्त्यावर अंधार असल्यामुळे समाजकंटक त्याचा फायदा उचलून महिला व मुलींची छेडछाड करतात.
दरम्यान, परिसरातील संतप्त रहिवाशांनी अशोकनगर संघर्ष समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या वतीने मंगळवारी मनपाच्या सातपूर विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांना निवेदन देत याकडे लक्ष वेधले आहे. कुमावत यांच्यासह सातपूर पोलिसांनाही निवेदन देत १५ दिवसात रस्ता न झाल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी अशोक नगर संघर्ष समिती अध्यक्ष दीपक मौले, उपाध्यक्ष सुनील मेनकर, वैभव ढिकले, सरचिटणीस वैभव देवरे, कार्याध्यक्ष कैलास काकड, सहसरचिटणीस शकुंतला दराडे, सदस्य रवींद्र भोर आदी उपस्थित होते.
